बालाजी देडगाव येथे शिवजयंती व शिव मंदिराचे भूमिपूजन उत्साहात

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून, नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे अत्यंत मंगलमय आणि उत्साही वातावरणात भव्य शिव मंदिराचे भूमिपूजन संपन्न झाले. शिवजयंतीच्या मुहूर्तावर आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याने संपूर्ण परिसरात भक्ती आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
स्थानिक ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत बबन देवा तांदळे यांच्या वेदोक्त मंत्रोच्चारात मंदिराच्या पायाभरणीचा विधी पार पडला. ‘जय भवानी, जय शिवाजी’ आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
या कार्यक्रमासाठी बालाजी देडगावसह परिसरातील शेकडो शिवभक्त, तरुण मंडळी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाला अध्यक्ष हभप सुखदेव महाराज मुंगसे लाभले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके यांनी केले. कार्यक्रमादरम्यान बोलताना महंत सुनीलगिरी महाराज, आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, भाजपा नेते अंकुशराव काळे, तेलकुडगावचे सरपंच सतीशराव काळे या मान्यवरांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि त्यांचे स्वराज्य प्रेम पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हे मंदिर एक प्रेरणास्थान ठरेल. लोकसहभागातून हे मंदिर अतिशय भव्य आणि देखणे साकारले जाणार आहे.
बालाजी देडगाव येथील हे शिवमंदिर भविष्यात सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याचे केंद्र ठरणार असून, आजच्या भूमिपूजन सोहळ्याने ग्रामस्थांमध्ये एकीचे दर्शन घडवले आहे.
या सोहळ्यासाठी हभप प्रदीप महाराज वाघमोडे, डॉ. कोलते, आदिनाथ निकम, देवराव मुंगसे, संकेत मुंगसे, लक्ष्मण मुंगसे, दत्तात्रय काळे, नवनाथ माने, बंडू गोफने, युवा नेते संभाजीराव लोंढे, अर्जुन कर्डिले, चांगदेव महाराज तांबे, निलेश कोकरे, आकाश चेडे, आदिनाथ उंडे, सुरेश कुटे, विठ्ठलराव काळे आजिनाथ आठरे, बाळासाहेब कुटे, भाऊसाहेब मुंगसे, आदर्श शिक्षक भाऊसाहेब सावंत, उपसरपंच आनंद दळवी, सदस्य पोपट मुंगसे, कानिफनाथ गोयकर, विश्वास हिवाळे टेलर, बथूवेल हिवाळे, अनिल पेटे, नवनाथ फुलारी, कुंडलिकदादा कदम, रघुनाथ कुटे पुढारी आदी शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार युनूस पठाण यांनी केले तर आभार छत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मच्छिंद्र मुंगसे यांनी मानले.