फत्तेपूर ग्रामपंचायतला क्षयमुक्त पुरस्कार प्रदान

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील फत्तेपूर येथील ग्रामपंचायतला क्षयमुक्त पुरस्कार जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ आणि अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम जिल्हा क्षयरोग केंद्र अहमदनगर अंतर्गत क्षयमुक्त ग्रामपंचायत अभियान सन 2023-24 चा गुणगौरव सोहळा 2 सप्टेंबर 2024 रोजी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात संपन्न झाला. अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ आणि अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते जिल्ह्यातील क्षयमुक्त ग्रामपंचायतींना पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र  देण्यात आले. नेवासा तालुक्यातील फत्तेपूर ग्रामपंचायतचे सरपंच निलोफर ईस्माइल शेख, उपसरपंच अनिता दत्तात्रय गवते यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले. यावेळी फत्तेपूरचे सरपंच, उपसरपंच यांच्या समावेत ईस्माइल शेख, दत्तात्रय गवते, प्रकाश गायकवाड सर, कदिरभाई शेख, साईनाथ बनसोडे, राजेंद्र बोरुडे उपस्थित होते. या गुणगौरव सोहळ्यासाठी जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी दादासाहेब गुंजाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापुसाहेब नागरगोजे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे, जिल्हा क्षय अधिकारी डॉ. अविनाश आहेर आणि अहमदनगर जिल्ह्यातील पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी मार्गदर्शन करुन पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींचे अभिनंदन केले.