बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- श्री क्षेत्र पावन महागणपती देवस्थान (वनीकरण) बालाजी देडगाव येथे दिव्य ज्योती जागृती संस्थानचे संस्थापक व संचालक सद्गुरु सर्वश्री आशुतोषजी महाराज यांच्या अनंत कृपाशीर्वादाने श्री स्वामी अमोघानंदजी यांच्या दिव्य वाणीतून सामाजिक व आध्यात्मिक विषयावरती शनिवार दिनांक 14 सप्टेंबर ते रविवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी सायंकाळी ५:१५ ते ६:४५ या वेळेत अध्यात्मिक प्रवचनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमातून अध्यात्मिक दृष्ट्या श्री गणपतीचे महात्म्य तसेच भारतीय संस्कृती, मुलांवरील संस्कार, वाढत चाललेली तरुणाई मधील व्यसनाधीनता या आणि अशा अनेक सामाजिक मुद्यांसह विविध दाखले देत मार्गदर्शन केले. याचबरोबर मनुष्य जीवनाची सार्थकता अंर्तघटातील स्थित असलेल्या आत्मतत्त्वाच्या प्रत्यक्ष अनुभूतीशिवाय अशक्य आहे , पूर्ण सद्गुरु का धारण करावा ? पूर्ण सद्गुरु कसा ओळखावा? पूर्ण सद्गुरु जीवनात आल्यानंतर आपल्या देहातील आत्मरुपी ईश्वराची प्रचिती आणून देतो, हे समजावून सांगण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांच्यासह अनेक संतांचे विविध दाखले देत स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला बालाजी देडगाव, माका ,पाचुंदा, म.ल. हिवरे या गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री क्षेत्र पावन महागणपती देवस्थान भक्त सेवा मंडळाच्या वतीने व ह. भ. प. सुखदेवजी महाराज मुंगसे यांच्या शुभहस्ते श्रीस्वामी अमोघानंदजींचे पुष्पहार-श्रीफळ देऊन संत पूजन करण्यात आले.
