तक्षशिला ज्युनिअर कॉलेजचा माजी विद्यार्थी आर्मीत दाखल; विद्यालयाने केला सन्मान

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- तक्षशिला ज्युनिअर कॉलेजच्या शैक्षणिक वर्ष 2022 मधील इयत्ता बारावीमधून उत्तीर्ण झालेला विद्यार्थी करण संजय काळे हा नुकत्याच पुणे येथे पार पडलेल्या आर्मी भरतीमध्ये उत्तुंग यश मिळवत जीडी या प्रकारात त्याची निवड झाली. ही बाब तक्षशिला ज्युनिअर कॉलेज व इंग्लिश मीडियम स्कूल साठी अत्यंत अभिमानास्पद आहे. त्यामुळे तक्षशिलाच्या मानात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
यावेळी मन्वंतर संस्थेचे तक्षशिला ज्युनिअर कॉलेज इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने करण संजय काळे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मन्वंतर संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. विजय कदम यांनी करण काळे याचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच तक्षशिलाचे प्राचार्य विठ्ठल कदम व उपप्राचार्य संदीप खाटीक यांनीही करणचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. करण याने झालेल्या सन्मानास उत्तर देताना आपला भरती होईपर्यंतचा प्रवास विद्यार्थ्यांच्या समोर ठेवला. करण म्हणाला, कुठल्याही क्षेत्रात यश मिळवायचे असल्यास जीवनात सातत्य ठेवणे गरजेचे आहे. तसेच अपयशाने खचून न जाता पुन्हा जोमाने प्रयत्न करणे तेवढेच महत्त्वाचे आहे. विद्यालयाने केलेला सन्मान हा आयुष्यात खूप मोठा असतो, असेही करण याने नमूद केले. यावेळी विद्यालयातील विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ तसेच तक्षशिलाचे शिक्षकवृंद उपस्थित होते.