जनशक्ती ( वृत्तसेवा)- तीन दिवस चालणाऱ्या श्री साई पुण्यतिथी उत्सवाचा आज मुख्य दिवस आहे. साईबाबांच्या काकड आरतीने मुख्य दिवसाला सुरवात झाली आहे. उत्सवानिमित्त देशभरातील भाविक मोठ्या संख्येने शिर्डीत दाखल होत आहेत. प्रत्येक साई भक्ताचे दर्शन व्हावे, यासाठी आज रात्रभर साई मंदिर खुले राहणार आहे. आज 106 वा पुण्यतिथी उत्सव साजरा होत आहे.पुण्यतिथी उत्सवा निमिती साई मंदिर व मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट करून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवानिमित्त मुख्य दिवशी समाधी मंदिरात संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश अंजू शेंडे (सोनटक्के) व प्रेमानंद सोनटक्के यांनी श्रींची पाद्यपूजा केली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, प्रशासकीय अधिकारी तथा प्र. उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीपकुमार भोसले, मंदिर प्रमुख विष्णु थोरात, प्र. जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके उपस्थित होते. आज पुण्यतिथी उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने साईबाबांच्या भिक्षा झोळीचा उत्साह पार पडला. यावेळी भिक्षा झोळी परिधान करून शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी तसेच साई संस्थांच्या पदाधिकाऱ्यासह शिर्डी ग्रामस्थ साईभक्त मोठ्या संख्येने भिक्षा झोळीमध्ये सहभागी झाले होते. साईबाबा हयातीत असताना पाच घर भिक्षा मागून स्वतःचा उदरनिर्वाह करत अन्नदान करत असत. हीच परंपरा गेली १०६ वर्षापासून साईंच्या शिर्डीत साई संस्थांन व ग्रामस्थांनी सुरू ठेवली आहे. आज विजयादशमी तसेच पुण्यतिथीच्या मुख्य दिवशी साई संस्थांच्या वतीने भिक्षा झोळीचे आयोजन करण्यात आलं होत. दान देण्यासाठी ग्रामस्थ तसेच परिसरातून भक्त मोठ्या संख्येने भिक्षा झोळीत दान देण्यासाठी येत असतात. भिक्षा झोळीतून आलेलं दान साईबाबांच्या प्रसादलाय दिले जाते. त्या ठिकाणी साईंच्या दर्शनाला आलेले लाखो साई भक्त महाप्रसाद घेत आहेत.
