जेऊर हैबती येथील यमाई मातेच्या यात्रोत्सवाची जंगी हगाम्याने सांगता 

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती येथे यमाई मातेचा यात्रा उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी व नामवंत मल्लांच्या कुस्त्यांनी संपन्न झाला. येथील यमाई माता नवसाला पावणारी असून नवरात्र उत्सव काळात हजारो भाविकांनी दर्शन घेतले. त्याचबरोबर यात्रा उत्सवानिमित्ताने गंगेचे पाणी कावडीने आणून देवीला स्नान घालण्यात आले. तर भजने, प्रवचने व दररोज अन्नदान अशा विविध कार्यक्रमांनी हा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.दरवर्षीप्रमाणे मोठ्या प्रमाणात यात्रा भरली असून मेव्याची दुकाने, खेळण्या, सौंदर्य प्रसाधनांची दुकाने ,लहान मुलांची खेळणी तसेच लहान मुलांसाठी जम्पिंग उड्या व अनेक प्रकारची संसार उपयोगी वस्तू यात्रेमध्ये आले होते. भाविकांनी याचा मनसोक्त लाभ घेतला. यात्रेच्या शेवटच्या दिवशी नामवंत मल्लांच्या हजेरीत कुस्त्याचा फड मोठ्या आनंदात पार पाडला. नियोजनबद्ध कुस्त्यांची आयोजन करण्यात आले होते. शेवटची इनामाची पाच हजार रुपयांची कुस्ती होऊन कुस्त्यांची सांगता करण्यात आली.

हा यात्रा उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी माजी सरपंच रामदास खराडे, सरपंच महेशराजे म्हस्के, यमाई माता ट्रस्टचे अध्यक्ष अशोक आप्पा खराडे, उपाध्यक्ष अण्णा पाटील म्हस्के, सचिव रावसाहेब खराडे, खजिनदार अण्णासाहेब जावळे, विश्वस्त आबासाहेब रिंधे, आदिनाथ खराडे, दिलीपराव टाके, अजित खराडे, बाळासाहेब मुरकुटे व यात्रा कमिटीने विशेष कष्ट घेत सहकार्य केले.