बालाजी देडगाव येथे उद्यापासून श्री बालाजी यात्रा उत्सव

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे उद्या गुरुवार (ता.१७) पासून श्री बालाजी यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने पहाटे ४ वाजता श्री बालाजी पालखी मिरवणूक होईल. सकाळी १० ते ४ पर्यंत दुर्गा भजनी मंडळ नगर यांचे संगीत भजन होईल. तसेच दिवसभरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री बालाजी यात्रा उत्सवासाठी महाराष्ट्रातून भाविक दर्शनासाठी येणार असून तिरुपतीनंतर देडगावचे बालाजी हे महाराष्ट्रात स्वयंभू देवस्थान आहे. कोजागिरी पौर्णिमा निमित्ताने भाविक भक्तिभावाने येत असतात. तसेच येणाऱ्या भाविकांसाठी सकाळी व सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार व शुक्रवार रात्री शोभेची दारू व फटाक्यांची आतषबाजी होणार आहे. शुक्रवारी (ता.१८) सकाळी हजऱ्याचे आयोजन करण्यात आले असून दुपारी ३ वाजता जंगी हगाम्याचे आयोजन करण्यात आले आहे. या हगाम्यासाठी महाराष्ट्रातून नामवंत मल्ल हजेरी लावणार आहेत.

शनिवार दिनांक १९ रोजी सकाळी ९ ते ११ देवगडचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरी यांचे तीर्थप्रसादाच्या किर्तनाने यात्रा उत्सवाची सांगता होईल.यात्रा उत्सवात जास्तीत जास्त भाविकांनी सहभाग नोंदवून यात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन यात्रा उत्सव कमिटी, बालाजी देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत देडगाव, समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ यांनी केले आहे.