जनशक्ती (वृत्तसेवा)- भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड (वय ८४) यांचं निधन झालं आहे. मधुकर पिचड यांना १५ ऑक्टोबरला ब्रेन स्ट्रोकचा झटका आला होता. त्यांच्यावर गेल्या दीड महिन्यांपासून नाशिकच्या एका रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांची आजारपणासोबत सुरु असलेली झुंज आज संपली व त्यांची प्राणज्योत मालवली. मधुकर पिचड यांच्या निधनामुळे भाजपची मोठी हानी झाली आहे. मधुकर पिचड यांचं आदिवासी भागात मोठं काम आहे. ते राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री देखील होते. ते नगरच्या अकोले विधानसभा मतदारसंघातून १९८० ते २००४ या काळात तब्बल सात वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. ते मार्च १९९५ ते जुलै १९९९ या काळात विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. त्यांनी २०१९ मध्ये मुलगा माजी आमदार वैभव पिचड यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या निधनाने राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.
