बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील श्री संत रोहिदास महाराज मंदिर सभागृहात राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची ६८ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कैलासनाथ मित्रमंडळाचे अरुण वांढेकर होते. तर प्रमुख मान्यवर म्हणून श्री संत रोहिदास महाराज देवस्थानचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, हरिभाऊ देशमुख, मनसेचे नेवासा तालुका संघटक योगेश लाड, संजय मुंगसे (जय हरी), बन्सीभाऊ वांढेकर, उत्तम तांबे, राजेंद्र पाठक, सनी अंधारे, बंटी मुंगसे, प्रदीप मुंगसे, बहिरनाथ मुंगसे, बबन तांबे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रसंत गाडगे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, अरुण वांढेकर, योगेश लाड यांनी मनोगत व्यक्त केले. अंधश्रद्धा निर्मूलन, ग्रामस्वच्छता, सामाजिक मागासलेपणा नष्ट करण्यासाठी गाडगेबाबांनी आपले उभे आयुष्य वेचले. गोरगरिबांच्या व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे म्हणून त्यांनी गावोगावी विद्यालये व वसतिगृहे सुरू केली. गाडगेबाबांनी कर्ज काढून सण साजरे न करण्याचा गावकऱ्यांना दिलेला मंत्र मोलाचा होता. गाडगेबाबांनी दिलेले विचार आजच्या तरुण पिढीसाठी मोलाचे असल्याचे मत मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. कैलासनाथ मित्रमंडळाचे हरिभाऊ देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले.