पत्रकार बन्सीभाऊ एडके यांना दर्पण पत्रकारिता पुरस्कार प्रदान

आपला जिल्हा

नेवासा (प्रतिनिधी)- नेवासा तालुका एकता पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात बालाजी देडगाव येथील पत्रकार बन्सीभाऊ एडके यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दर्पण पत्रकारिता पुरस्काने गौरविण्यात आले.
त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलात पत्रकार दिन व पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून मुकिंदपूर येथील श्रीराम साधना आश्रमाचे महंत सुनीलगिरीजी महाराज, आमदार विठ्ठलराव लंघे, श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी, नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव व त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचे संस्थापक साहेबराव घाडगेपाटील आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात मान्यवरांच्या शुभहस्ते साहेबराव घाडगेपाटील यांना शिक्षणमहर्षी तर ज्येष्ठ पत्रकार दिलीप शिंदे, कारभारी गरड व बन्सीभाऊ एडके यांना दर्पण पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी तसेच नेवासा तालुका एकता पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
पत्रकार बन्सीभाऊ एडके गेल्या २२ वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहे. त्यांनी विविध वृत्तपत्रातून पत्रकारिता केली आहे. आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील अन्यायग्रस्त व मागासलेल्या नागरिकांना न्याय देण्यासाठी ते सदैव कार्यरत असतात. पत्रकारिता क्षेत्रात डिजिटल माध्यमांचा प्रभाव वाढत असतांना गेल्या पाच वर्षांपासून ते जनशक्ती न्यूज या वेब पोर्टलच्या माध्यमातून नेवासा तालुक्यासह देशभरातील बातम्यांना आपल्यापर्यंत पोहचवत आहेत. तसेच संत रोहिदास महाराज ग्रामविकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून ते धार्मिक व सामाजिक क्षेत्रातही कार्यरत आहेत. या पुरस्काराबद्दल पत्रकार बन्सीभाऊ एडके यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.