टक्कल व्हायरस! ‘या’ जिल्ह्यातील लोक तीन दिवसात होत आहेत टकले 

महाराष्ट्र

जनशक्ती (वृत्तसेवा)- बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात सध्या ‘टक्कल व्हायरस’ने धुमाकूळ घातला आहे. शेगाव तालुक्यात असणाऱ्या बोंडगाव, कालवड आणि कठोरा या गावांमध्ये केसगळतीच्या आजाराची दहशत पसरली आहे. प्रथम लोकांच्या डोक्याला खाज सुटत असून त्यानंतर तीन दिवसांत संपूर्ण टक्कल पडत आहे. या आजाराची दखल जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने घेतली असून गावात आरोग्य सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. या गावांमध्ये टक्कल पडणाऱ्यांची संख्या आता ५१ वर पोहोचली आहे. येथे त्वचारोग तज्ञांचे पथकही दाखल झाले असून प्रथम कठोरा, बोंडगाव, हिंगणा या गावात तपासणी सुरु केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील पूर्णा नदीजवळील बोंडगाव, कालव आणि हिंगणा या गावांमध्ये अनेकांना या अज्ञात आजाराने ग्रासले आहे. येथील ग्रामस्थांच्या डोक्याला अचानक खाज सुरू होते. यानंतर केसगळती होऊन केस गळून पडतात आणि तीन दिवसांत टक्कल पडत आहे. या आजाराचा धसका परिसरातील सर्व नागरिकांनी घेतला आहे. बोंडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या कालवड येथे १३ नागरिकांना तर कठोरा येथील ७ नागरिकांना हा आजार झाला असून त्यांना पूर्ण टक्कल पडले आहे. मुले-मुली, वृद्ध महिला आणि पुरुष या सर्वांना हा त्रास झाला आहे. त्यामुळे बुलढाण्यात नवा व्हायरस पसरला की काय, अशी लोकांच्या मनात धडकी भरली आहे. स्थानिक आरोग्य विभागाने याबाबत सर्वेक्षण करून, अचानक सुरू झालेल्या या केसगळतीची कारणे शोधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. शेगाव तालुक्यातील सहा गावांमध्ये हा त्रास प्रामुख्याने आढळून आल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. अनेक नागरिकांनी केसगळतीची तक्रार केल्यानंतर भोनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्वचारोगतज्ज्ञ आणि इतर डॉक्टरांनी पाहणी केली.