जनशक्ती (वृत्तसेवा)- राज्यातील लोकसभा, विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात निवडणुकांचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. येत्या काही महिन्यात महाराष्ट्रात महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपरिषद या निवडणुका पार पडणार आहेत. याच पार्श्वभूमीवर सध्या सर्वच राजकीय पक्ष निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. त्यातच आज शिर्डीत भाजपचे राज्यस्तरीय अधिवेशन पार पडणार आहे. या राज्यस्तरीय अधिवेशनाला भाजपचे सर्व मंत्री, आमदार, खासदार उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनादरम्यान आगामी निवडणुकांची रणनिती ठरणार असल्याचे बोललं जात आहे.
आज रविवारी १२ जानेवारी रोजी भाजपचे राज्यस्तरीय अधिवेशन शिर्डीत आयोजित करण्यात आले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पक्षाध्यक्ष जे.पी नड्डा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्यासपीठावर संविधान पूजन करण्यात येणार आहे. या अधिवेशनानिमित्त शिर्डीत १ हजार व्हीआयपी येणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिर्डीतील मुख्य रस्त्यावर स्वागताचे शेकडो फलक, ५० कमानी, २५०० भाजपचे झेंडे लावण्यात आले आहेत. यावेळी भाजपच्या १५ हजार पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
