माका येथील कुस्ती स्पर्धेत आज येणार राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मल्ल

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील माका येथील ग्रामदैवत असलेल्या मंकावती मातेच्या यात्रेनिमित्त माका ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे व ग्रामस्थांच्या वतीने आज मंगळवारी (दि.१४) दुपारी ३ वाजता भव्य अशा कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती यात्रा कमिटीच्या वतीने देण्यात आली.
या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे भव्य असा देशातील नामांकित मल्लांचा कुस्त्यांचा हंगामा होय. यामध्ये प्रामुख्याने एशियन गेम्स स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या व सध्या राजस्थानमध्ये पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असणाऱ्या पैलवान नयना कनवाल, जागतिक पदक विजेती व हरियाणा येथील तहसीलदार पदी कार्यरत असलेल्या पैलवान दिव्या कक्रान, महान भारत केसरी व १०५ गदांचा मानकरी पैलवान माऊली जमदाडे यांच्यासह जागतिक तसेच देशपातळीवरील व इतर राज्यातील अनेक नामवंत पैलवान या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. सदर स्पर्धेमध्ये मानाच्या कुस्तीतील विजेत्या मल्लाला चांदीची गदा व रोख एक लाख एकावन्न हजार रुपयांचे पारितोषिक तसेच इतरही कुस्त्यांना लाखो रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. तरी परिसरातील सर्व भाविकांनी तसेच कुस्तीप्रेमींनी या महोत्सवात सहभाग घेऊन आनंद घ्यावा, असे आवाहन यात्रा कमिटी, सरपंच विजयाताई पटेकर, उपसरपंच अनिलराव घुले, कडूचंद कोकाटे गुरुजी, श्रीधर लोंढे, मुरलीधर रुपनर, सुभाष धुळे, ग्रामपंचायत सदस्य बबन भुजबळ, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानदेव पागिरे, जबाजी पांढरे, महादेव भानगुडे, चेअरमन संजय गाडे, डॉ. रघुनाथ पागिरे, पोलीस पाटील अशोक वाघमोडे, महादेव भानगुडे, ज्ञानदेव सानप सर, लोंढे भीमराज चेअरमन, माजी चेअरमन मल्हारी आखाडे, ग्रामपंचायत सदस्य अमोल पालवे, शिवसेना तालुका संघटक गोकुळ लोंढे, मच्छिंद्र लोंढे, डॉ. बाळू शिंदे, सुनील शिंदे, संजय आखाडे, संजय खेडकर, संजय भानगुडे, दिगंबर शिंदे, देविदास धनवटे, जनार्दन धनवटे, रामभाऊ बाचकर, शंकर गुलगे, आबा पालवे, दीपक आखाडे, व्हा.चेअरमन सुरेश तवार, शहादेव लोंढे यांनी केले आहे.