अब्दुलभैय्या शेख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

आपला जिल्हा

जनशक्ती (वृत्तसेवा)- फायनान्स कंपन्याकडून कर्जदारांची फसवणूक तसेच नेवासा तहसीलमधील रेशन, सेतू विभागातील सावळा गोंधळाची चौकशी करा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अब्दुलभैय्या शेख यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (ता.१६) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले.

आंदोलनकर्त्यांचा सर्वाधिक तक्रारीचा सूर फायनान्स कंपनीच्या विरोधात होता. कविता जोजारे, आशा अरगडे, कचरू पठाडे, असिफ पठाण, दिलीप राजळे आदींनी काही फायनान्स कंपनीची मनमानी भाषणातून मांडली. विशेष म्हणजे त्यात सर्वाधिक तक्रारदार संख्या महिलांची होती. काही फायनान्स कंपनीकडून वसुली, जप्ती करताना कसा अन्याय, मनमानी केली जात असते हे प्रांताधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेत सांगितले. संजय गांधी निराधार योजनेसह सरकारी लाभांच्या योजनांची प्रलंबित प्रकरणे, रेशन दुकानदारांच्या तक्रारी, दुकानदारांच्याही अडचणी यावर अब्दुलभैय्या शेख यांनी आंदोलनकर्त्यांसह चर्चा केली. त्यावर जिल्हा पुरवठा अधिकारी हेमलता बडे यांना नेवासा तहसीलदार यांना त्वरित पत्र दिले असून कारवाई करण्यासाठी पत्र दिले आहे. प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करुन निवेदन स्विकारले. यावेळी राष्ट्रवादी कामगार संघटनेचे मकरंद राजहंस, राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष अभिराज आरगडे, मनसेचे विलास देशमुख, सतीश कावरे आदी यावेळी उपस्थित होते.