लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता येण्यास सुरुवात

महाराष्ट्र

जनशक्ती (वृत्तसेवा)- महाराष्ट्र सरकारची महत्त्वाची योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. जानेवारी महिन्याचा हप्ता २६ जानेवारीपर्यंत देण्याचे आश्वासन अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. त्यानुसार, २४ जानेवारीच्या सायंकाळपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
जुलै २०२४ च्या पावसाळी अधिवेशनात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यान्वित केली. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये देण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार, अटी शर्थींच्या आधारे सरकारने महिलांकडून अर्ज भरून घेतले अन् पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत सहा हप्ते पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत, तर जानेवारीचा सातवा हप्ताही पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वीच महिला व बालविकास खात्याकडे ३ हजार ७०० कोटींचा चेक दिल्याची माहिती अजित पवारांनी दिली होती. त्यानुसार २६ जानेवारीपासून पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होईल, असंही सांगितलं होतं. २४ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून पैसे येण्यास सुरुवात झाली असून पात्र महिलांनी त्यांची आधार कार्डशी लिंक असलेली बँक खाती तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे. २६ जानेवारीपर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.