मोठे व्हायचे असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही: उद्योजक अनंत ढोले

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- मुळा एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, माकाचे यशोरंग वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ आज (ता.३१) मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे चैतन्य उद्योग समुहाचे अध्यक्ष अनंत ढोले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, मोठे व्हायचे असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही. समाजात वावरत असताना काय अडचणी आहेत त्या शोधा, त्यानुसार समाजाची गरज ओळखून व्यवसाय निवडा. व्यावसायिक होण्याचे स्वप्न पाहण्यापेक्षा उद्योजक होण्याचे स्वप्न पहा, असे त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉ. भानुदास चोपडे यांनी केले. तर अहवाल वाचन प्रा. मंदार कुलकर्णी यांनी केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य वसंत घुले होते. सूत्रसंचालन प्रा.अमोल दरंदले यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. अमोल दहातोंडे यांनी करून दिला. तर आभार प्रा. मंदार कुलकर्णी यांनी मानले. यावेळी पर्यवेक्षक गायकवाड सर, निलेश पाटील, सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर सेवक, विद्यार्थी विद्यार्थिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.