अहिल्यानगर जिल्ह्याच्या ९१२ कोटी ७८ लाख रुपयाच्या प्रारुप आराखड्यास मान्यता

आपला जिल्हा

जनशक्ती (वृत्तसेवा)- राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अहिल्यानगर जिल्ह्यासाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत २०२५-२६ च्या रुपये ७०२ कोटी ८९ लक्ष अनुसूचित जाती योजनेअंतर्गत १४४ कोटी रुपये आणि आदिवासी उपयोजनेअंतर्गत ६५ कोटी ८९ लक्ष अशा एकूण ९१२ कोटी ७८ लाख रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता देण्यात आली.
बैठकीस आमदार शिवाजीराव गर्जे, सत्यजित तांबे, मोनिका राजळे, आशुतोष काळे, डॉ. किरण लहामटे, अमोल खताळ, विठ्ठल लंघे, काशिनाथ दाते, हेमंत ओगले, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, उपवनसंरक्षक धर्मवीर साळविठ्ठल, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर आदी उपस्थित होते. एकूण प्रस्तावित आराखड्यापैकी १७५ कोटी ७२ लक्ष २५ हजार रुपये जिल्हा विकास आराखड्यासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. वित्त व नियोजन मंत्री यांचे अध्यक्षतेखाली होणाऱ्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये जिल्हा वार्षिक योजनेचा (सर्वसाधारण) एकूण ७०२ कोटी ८९ लक्ष रुपयांचा आराखडा सादर करण्यात येईल. तसेच बैठकीमध्ये एकूण रुपये १५० कोटी अतिरीक्त नियतव्ययाची मागणी करण्याचे निश्चित करण्यात आले.