जनशक्ती (वृत्तसेवा)- नेवासा तालुक्यातील सलबतपूर येथील नामांकित गुणवत्ता, संस्कार व संस्कृती जपणारी शाळा म्हणून लौकिक असलेली व आय. एस.ओ.मानांकन प्राप्त चाइल्ड करिअर इंग्लिश मीडियम अँड ज्युनिअर कॉलेजच्या इयत्ता 12 वी च्या 2024-2025 बॅचचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य रवींद्र गावडे सर तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रणव जोशी, प्रा.संदीप चव्हाण, शिवाजी कदम, सुरेश गवारी उपस्थित होते.
जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी स्वयंशिस्त, कष्ट व नियोजन गरजेचे असते, असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे डॉ. प्रणव जोशी यांनी केले. संदीप चव्हाण सर यांनी आपल्या मनोगतामध्ये उत्तर पत्रिका कशी लिहावी व वेळेचे व्यवस्थापन कसे करावे, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार होत असतात. त्याचा विद्यार्थ्यांना खूप उपयोग होतो. आपण सुशिक्षित होत असताना सुसंस्कारित होणे ही महत्त्वाचे असते असे प्रतिपादन प्राचार्य रवींद्र गावडे सर यांनी केले. प्रा. संजय गरुटे सर यांनीही विद्यार्थ्यांना बहुमूल्य मार्गदर्शन केले. विद्यार्थी कहाते विजया, खाटीक साक्षी, गव्हाणे अंजली, मापारी श्रावणी, गरगडे आदित्य, शिंदे ओम यांनी आपली मनोगते व्यक्त केली. निरोप घेताना विद्यार्थ्यांना गहिवरून आले होते. चाइल्ड करिअर जुनिअर कॉलेजच्या सर्व प्राध्यापकांनी आम्हाला खूप छान शिकवले व बहुमूल्य मार्गदर्शन केले, त्यांचे ऋण आम्ही आयुष्यात कधीही विसरणार नाही, याविषयी त्यांनी आपली कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहरुख सय्यद यांनी केले तर आभार कैलास तांबे यांनी मानले.
