तेलकुडगाव येथे स्व. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांच्या पुतळ्यांचे दहन

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- सकल हिंदू समाज व तेलकुडगाव ग्रामस्थ यांच्यावतीने स्व. संतोष देशमुख यांना न्याय मिळावा व मारेकऱ्यांना फाशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच यावेळी मारेकऱ्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यांचे दहन करण्यात आले.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच स्व. संतोष देशमुख यांची अतिशय क्रूर व निर्घृणपणे हत्या झाली. सीआयडीच्या चौकशीतून संतोष देशमुख यांच्या हत्येचे सर्व व्हिडिओ व फोटो उभ्या महाराष्ट्रने पाहिले. तेव्हा संतोष देशमुख यांच्या कुटूंबासह देशभरासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शोक व्यक्त करण्यात आला. स्व. संतोष देशमुख यांचे फोटो पाहिल्यानंतर संतप्त झालेल्या तेलकुडगाव येथील सकल हिंदू समाज व तेलकुडगाव ग्रामस्थ यांच्यावतीने स्व. संतोष देशमुख यांना न्याय मिळावा व मारेकऱ्यांना फाशी झालीच पाहिजे, अशी मागणी करण्यात आली.
सरपंच स्व. संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करून मानवतेला काळीमा फासणारे कृत्य करणाऱ्या विकृत आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, यासाठी सकल हिंदू समाज, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहुन सर्वांच्या वतीने आरोपी मारेकऱ्यांच्या पुतळ्याचे दहन करून आरोपींना कठोरात कठोर कारवाई करून फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, अशा घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी सकल हिंदू समाज, ग्रामस्थ, तेलकुडगाव आदी उपस्थित होते.