देडगाव येथील नुकसानग्रस्त भागाची आमदार विठ्ठलराव लंघे यांच्याकडून पाहणी; अधिकाऱ्यांना दिल्या सूचना

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव व परिसरात मागील तीन दिवस झालेल्या वादळी वारा व पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या वादळाने अनेक घरांचे पत्रे उडाले आहेत. तसेच फळबागा व केळी बागांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे उन्मळून पडल्याने अनेक रस्ते बंद झाले आहेत. तसेत महावितरणाच्या तारा तुटल्याने वीज पुरवठा खंंडित झाला होता. आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देत तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले.

येथील बंडू कुटे यांच्यासह अनेकांच्या घरांची पत्रे उडाल्याने संसार उघड्यावर आले आहेत. तर केळी ,पपई असे अनेक फळबाग भुईसपाट झाल्या आहेत. महादेव मुरलीधर कदम यांचा दोन एकर केळीचा बाग पूर्ण भुईसपाट झाला असून बाळासाहेब कदम ,आदिनाथ उंडे, काशिनाथ देवकाते यांच्याही केळी बागांचे नुकसान झाले आहे. तसेच येथील राजेंद्र देशमुख यांच्या बांधकाम सुरू असलेल्या घराची पडझड झाली आहे. घटनेची माहिती समजताच आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत संबंधित खात्याच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. यावेळी नेवासा तहसीलदार डॉ. संजय बिरादार, गटविकास अधिकारी संजय लखवाल, तालुका कृषी अधिकारी धनंजय हिरवे, महावितरणचे उपअभियंता बडवे व महाजन साहेब, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सायम साहेब, तसेच बी. टी. सोनवणे, देडगाव मंडल अधिकारी सुनील खंडागळे , ग्रामविकास अधिकारी संतोष उल्हारे, कामगार तलाठी मंगल घुसिंगे, या सर्व अधिकाऱ्यांनी पाहणी करत तातडीने पंचनामे केले. तसेच नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती शासकीय अधिकाऱ्यांनी दिली. तसेच महावितरणकडूनही दुरुस्तीची कामे वेगात सुरू असून बहुतांशी कामे पूर्ण झाली आहेत.

यावेळी भाजप नेते अंकुश काळे, बबन पिसोटे, आकाश चेडे, गोकुळ वांढेकर, बळीराज्य संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र मुंगसे,  चंद्रभान कदम, अरुण वांढेकर, महादेव कदम, बाळासाहेब कदम, रामचंद्र कदम, बंडू मुंगसे, काशिनाथ देवकाते आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे म्हणाले की, शेतकऱ्यांसाठी कृषिमंत्र्याशी चर्चा करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन देत शेतकऱ्यांना धीर दिला. तर महावितरण अभियंत्यास फोन करून तातडीने पडलेले खांब लवकरात लवकर दुरुस्त करत पुन्हा वीज सूरळीत करून शेतकऱ्यांचा अडथळा थांबवा, अशा सूचना दिल्या.