बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे श्री संत नामदेव महाराज व श्री संत सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त तांबे वस्ती येथे हभप बन्सी महाराज तांबे यांचे कृपाशीर्वादाने, हभप गुरुवर्य महंत भास्करगिरीजी महाराज (श्रीक्षेत्र देवगड) यांच्या आशिर्वादाने व हभप गुरुवर्य मीराबाई महाराज मिरीकर यांच्या प्रेरणेने व हभप सुखदेव महाराज मुंगसे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता मीराबाई महाराज मिरीकर यांच्या काल्याच्या किर्तनाने झाली.
तांबे वस्ती येथील संत सावता महाराज मंदिर सभागृहात आयोजित या अखंड हरिनाम सप्ताह काळात विविध किर्तनकारांच्या किर्तनांचे आयोजन करण्यात आले होते. हभप सुखदेव महाराज मुंगसे (बालाजी देडगाव), हभप ज्ञानेश्वर महाराज पवने (जामखेड), सोमेश्वर महाराज गवळी (वैष्णव सेवा आश्रम, बऱ्हाणपूर), हभप राम महाराज खरवंडीकर, हभप गुरुवर्य महादेव महाराज राऊत (बीड), हभप गुरुवर्य प्रकाशनंदगिरीजी महाराज (श्रीक्षेत्र देवगड संस्थान), हभप गुरुवर्य रामगिरी महाराज येळीकर (येळेश्वर संस्थान श्रीक्षेत्र येळी) यांच्या कीर्तनसेवा उत्साहात संपन्न झाल्या. बुधवारी सायंकाळी ४ वाजता दिंडी मिरवणूक झाली. तसेच संत सावता महाराज चरित्रावर हभप सदाशिव महाराज पुंड (देडगाव) यांचे प्रवचन झाले. सप्ताहकाळात येणाऱ्या भाविकांसाठी दोन वेळेस महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. गुरुवारी (ता.२४) सकाळी गुरुवर्य मीराबाई महाराज मिरीकर (ज्ञानाई सेवा आश्रम, श्री क्षेत्र आळंदी देवाची) व हभप अंकुश महाराज कादे यांचे काल्याचे किर्तन झाले व नंतर महाप्रसाद झाला. सप्ताहाच्या सांगता प्रसंगी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब सोनवणे आदी मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली. या सोहळ्यासाठी संत सावता ग्रुप, तांबे परिवार, समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले.
