देडगाव शाळेतून बदली झालेल्या शिक्षकांना निरोप व नव्याने आलेल्या शिक्षकांचे स्वागत 

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेतील एकाच वेळी चार शिक्षकांची बदली झाली. आदेश प्राप्त झाल्यानंतर संबंधित शिक्षकांना निरोप देण्यात आला. तर बदली प्रक्रियेतून नव्याने दाखल झालेल्या शिक्षकांचे स्वागत करण्यात आले.  बदली झालेल्या शिक्षकांना निरोप देण्यासाठी माजी सरपंच बाजीराव पाटील मुंगसे, सरपंच चंद्रकांत मुंगसे, उपसरपंच बाळासाहेब मुंगसे, बालाजी देवस्थानचे अध्यक्ष नवनाथ मुंगसे, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, महादेव कदम, बन्सीभाऊ मुंगसे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रशांत भाऊसाहेब ससाणे, संपत ससाणे तसेच कृषी अधिकारी संजय कदम आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कार्यमुक्त झालेल्या शिक्षकांचे विशेष कौतुक करण्यात आले. बथुवेल हिवाळे, दत्तात्रय धामणे, कविता करांडे व अश्विनी कदम यांनी शाळेच्या शैक्षणिक उन्नतीत, विविध उपक्रमांच्या अंमलबजावणीत, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात उल्लेखनीय कामगिरी बजावली, असे गौरोवोदगार उपस्थित मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आले. 
निरोप समारंभात एक विशेष उल्लेखनीय क्षण घडला. गावातील शिक्षणप्रेमी महादेव कदम यांनी त्यांच्या नातवाच्या वाढदिवसानिमित्त शाळेला ५० झाडे मोफत उपलब्ध करून दिली. शाळेच्या भौतिक सुविधा बरोबर नैसर्गिक वातावरण व वृक्षारोपणासाठी हा उपक्रम मोलाचा ठरला. या योगदानाबद्दल त्यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व शाळेतर्फे त्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
तसेच शाळेमध्ये नव्याने हजर झालेल्या शिक्षकांचे स्वागत करण्यात आले. यामध्ये अंबादास बोरुडे, श्रीमती संध्या मुंगसे, संभाजी कडू व सुवर्णा काळे  या शिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या स्वागतप्रसंगी सरपंच चंद्रकांत मुंगसे, ग्रामपंचायत सदस्य विश्वास हिवाळे, माजी सरपंच दत्ता पाटील मुंगसे ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रशांत ससाणे, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, पत्रकार इन्नुस पठाण, बहिरनाथ मुंगसे तसेच शिक्षणप्रेमी नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सतीशकुमार भोसले यांनी शाळेच्या यशात प्रत्येक शिक्षकांचा असलेला वाटा अधोरेखित करत नवागत शिक्षकांनीही त्याच परंपरेला पुढे नेण्याचे आवाहन केले. तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक शिक्षक सावंत भाऊसाहेब यांनीही शिक्षक समाजातील परिवर्तनकर्ते असल्याचे सांगत सर्वांचे कौतुक केले.