जनशक्ती (वृत्तसेवा)- हिंदूधर्मामध्ये दिवाळी हा सण अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो. आश्विन वद्य त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी, आश्विन वद्य चतुर्दशी तिथीला नरक चतुर्दशी, अमावस्या तिथीस लक्ष्मीपूजन आणि कार्तिक शुद्ध प्रतिपदा तिथीस बलीप्रतिपदा, कार्तिक महिन्याच्या द्वितीया तिथीला भाऊबीज, अशा पद्धतीने दिवाळी सण साजरा केला जातो. दिवाळीतील लक्ष्मी पूजनास विशेष महत्त्व आहे. आश्विन महिन्यातील अमावस्या तिथीस लक्ष्मीपूजन केले जाते. या दिवशी घराघरांमध्ये धनाची देवता लक्ष्मीमाता, कुबेर देवता, गणपती बाप्पाचीही विधीवत पूजा केली जाते. पण यंदा लक्ष्मीपूजन 20 ऑक्टोबर की 21 ऑक्टोबर रोजी आहे, यावरुन नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झालाय. लक्ष्मीपूजनाची खरी तारीख कोणती, या प्रश्नामुळे लोक संभ्रमात आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ.
अमावस्या तिथी 20 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 3.44 वाजता सुरू होणार असून 21 ऑक्टोबर 2025 रोजी संध्याकाळी 5.54 वाजता तिथी समाप्त होणार आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, 21 ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन करणं शास्त्रसंमत आहे. तज्ज्ञांच्या मते, 21 ऑक्टोबर रोजी सूर्यास्तानंतर जवळपास अडीच तासांमध्ये लक्ष्मीपूजन करू शकता. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार लक्ष्मीपूजन 21 ऑक्टोबर 2025 रोजी संध्याकाळी 6.10 वाजेपासून ते रात्री 8.40 वाजेदरम्यान करू शकता. 20 ऑक्टोबर 2025 (सोमवार) रोजी प्रदोषकाळात अमावस्या तिथीचा प्रारंभ होत आहे. त्यामुळे ती तिथी प्रदोषव्याप्त मानली जाते. मात्र दुसऱ्या दिवशी, म्हणजेच 21 ऑक्टोबर 2025 (मंगळवार) रोजी तीन प्रहरांपेक्षा अधिक काळ अमावस्या राहणार आहे. म्हणूनच लक्ष्मीपूजन करण्यासाठी मंगळवार, 21 ऑक्टोबर 2025 हा दिवस शास्त्रसंमत आणि अत्यंत शुभ मानला गेला आहे. या दिवशी अमावस्या आणि प्रतिपदा या दोन्ही तिथींचा योग असल्याने, सायंकाळी प्रदोषकाळात, म्हणजेच सूर्यास्तानंतर सुमारे 2 तास 24 मिनिटांच्या कालावधीत लक्ष्मीपूजन करणे सर्वात मंगलकारी ठरेल.
