जनशक्ती (वृत्तसेवा)- नेवासा तालुक्याचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटात जाहीर प्रवेश केला आहे. मुरकुटे यांनी प्रहार जनशक्ती पक्षाला रामराम ठोकत मुंबई येथे आज राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, आमदार शिवाजीराव गर्जे, सचिन मुदगुल, बाबासाहेब कांगुणे, निलेश पाटील, शैलेश पाटील आदी उपस्थित होते.
बाळासाहेब मुरकुटे यांनी भाजपच्या तिकीटावर २०१४ मध्ये विधानसभा निवडणूक जिंकली होती. मात्र, त्यांनी २०२४ मध्ये विधानसभा निवडणुकीपुर्वी प्रहार जनशक्ती पक्षामध्ये प्रवेश करत विधानसभा निवडणूक लढवली होती. परंतु या निवडणुकीत त्यांना अपयश आले होते. मुरकुटे यांनी काल प्रहार जनशक्ती पक्षाला रामराम करत आता अजित पवार गटात प्रवेश केला आहे. मुरकुटे यांच्या प्रवेशाने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाची ताकद नक्कीच वाढणार आहे, असे मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

