बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे सालाबादप्रमाणे कुकाणा रोड येथील कुटे वस्तीवरील ग्रामस्थांच्यावतीने सालाबादप्रमाणे हनुमान उत्सवानिमित्त महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने व हभप सुखदेव महाराज मुंगसे यांच्या अधिपत्याखाली मंगळवार ३० एप्रिल ते मंगळवार ७ मे या कालावधित अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.या सप्ताहकाळात दररोज महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांची किर्तने होणार आहेत. यामध्ये हभप कविताताई कदम, हभप गाथामूर्ती सुखदेव महाराज मुंगसे, हभप भागवतानंद कन्या सविताताई महाराज दरंदले, हभप वाणीभूषण आदिनाथ महाराज निकम, हभप भागवताचार्य आरतीताई महाराज शिंदे, हभप सोमनाथ महाराज खाटीक, हभप भागचंद महाराज पाठक व हभप श्रीधर महाराज शिंदे यांचे काल्याचे किर्तन होऊन सप्ताहाची सांगता होणार आहे. या अखंड हरिनाम सप्ताहनिमित्त सकाळी व सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ यांनी केले आहे.
