जनशक्ती (वृत्तसेवा)- शासन निर्णय ०१ऑक्टोबर२०२५ अन्वये नगर तालुक्यातील उच्च प्राथमिक असलेली, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आठवडमध्ये “माजी विद्यार्थी संघाची” स्थापना करण्यात आली. शाळेत शिक्षण घेतलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांना, पालकांना आवाहन करण्यात आले होते, संघ स्थापनेकरिता चांगला प्रतिसाद दिसून आला. मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संदीप वाघमारे यांनी आपल्या प्रास्ताविकातून माजी विद्यार्थी संघाबाबत माहिती दिली. संघाची रचना, कर्तव्ये, कार्य, योगदान याबद्दल सविस्तर मुद्देसूद माहिती दिली. यावेळी आठवड ग्रामपंचायतीचे उपसरपंच यांनी अध्यक्ष पदाकरिता सूचना मांडली. त्यानुसार सर्वानुमते दीपक लगड यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तसेच सुनील चोभे यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली. प्रवीण मोरे यांची कोषाध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड झाली. शाळेतील उपक्रमशील शिक्षक गोरख वाबळे यांची सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली. उर्वरित सर्व माजी विद्यार्थांची सदस्य म्हणून नोंदणी केली गेली.
अध्यक्ष निवडीनंतर, नूतन अध्यक्ष दीपक लगड यांनी आपल्या मनोगतात, शाळेच्या विकासास कटिबद्ध राहण्याची खात्री दिली. शाळेतील विद्यार्थ्यांकरिता “ज्ञानवंत बक्षीस योजना” राबविण्याचे जाहीर केले. तसेच गावाबाहेरील माजी विद्यार्थ्यांची आपल्या संघात नोंदणी करून, त्यांना आपल्या योगदान कार्यात सहभागी करून घेऊन, शाळेचा विकास करू अशी घोषणा केली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका प्रमिला साठे यांनी केले, तर आलेल्या सर्वांचे आभार शाळेचे तंत्रस्नेही शिक्षक अजय भद्रे यांनी मानले.

