तालुकास्तरीय गुणदर्शन स्पर्धेत हत्राळ सैदापूर प्राथमिक शाळेचा डंका; दोन विद्यार्थिनींची जिल्हास्तरावर निवड

आपला जिल्हा

पाथर्डी (प्रतिनिधी)- तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हत्राळ सैदापूरच्या विद्यार्थिनींनी आपल्या कलागुणांच्या जोरावर घवघवीत यश संपादन केले आहे. एम. एम. निऱ्हाळी विद्यालय, पाथर्डी येथे ७ जानेवारी २०२६ रोजी पार पडलेल्या या स्पर्धेत शाळेच्या तीन विद्यार्थिनींनी प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

या स्पर्धेत वेशभूषेनुसार सादरीकरण आणि गोष्ट सादरीकरण अशा दोन महत्त्वाच्या प्रकारात शाळेने बाजी मारली आहे:
वेशभूषा सादरीकरण (कुमार गट): इयत्ता ७ वी मधील साक्षी केदार हिने आपल्या उत्कृष्ट सादरीकरणाने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला.
गोष्ट सादरीकरण ( किशोर गट – ६ वी): इयत्ता ६ वी मधील श्रावणी गणेशकर हिने प्रभावी कथाकथन करत प्रथम क्रमांक मिळवला.
गोष्ट सादरीकरण (कुमार गट – ७ वी): इयत्ता ७ वी मधील वैष्णवी गणेशकर हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला.
प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या या विद्यार्थिनींची आता जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या
विद्यार्थिनींना मुख्याध्यापक उल्हास बटूले, प्रतिभा खेडकर मॅडम, अभिमान पाखरे सर, आजिनाथ भडके सर, पदवीधर शिक्षक शैलेश खनकर सर, एकनाथ गायकवाड सर यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल यशस्वी विद्यार्थिनी व मार्गदर्शक शिक्षकांचे शालेय व्यवस्थापन समिती, हत्राळ – सैदापूर गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य,तसेच पालकांकडून विशेष कौतुक होत आहे. ग्रामीण भागातील मुलांमध्ये असलेल्या सुप्त कलागुणांना वाव मिळाल्यास ती मुले कोणत्याही स्तरावर चमकू शकतात, हे या विद्यार्थिनींनी सिद्ध केले आहे. जिल्हास्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी या विद्यार्थिनींना सर्व स्तरांतून शुभेच्छा देण्यात येत आहेत.