जनशक्ती (वृत्तसेवा)- भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेला जवान पत्नीच्या डिलिव्हरीसाठी सुट्टीवर गावी आला असताना त्याचा अपघाती मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना साताऱ्यात घडली. सिकंदराबाद–श्रीनगर येथे भारतीय सैन्य दलात सेवा बजावणारे सातारा तालुक्यातील दरे गावचे वीर जवान प्रमोद परशुराम जाधव यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला. या घटनेने दरे गावासह संपूर्ण परळी खोऱ्यावर शोककळा पसरली आहे.
प्रमोद जाधव यांना आई नसल्याने पत्नीच्या डिलिव्हरीसाठी ते सुमारे आठ दिवसांपूर्वी सुट्टीवर गावी आले होते. दरम्यान, काही कामानिमित्त दुचाकीवरून वाढे फाट्याच्या दिशेने जात असताना पुरुष भिक्षेकरी गृहाजवळ टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात प्रमोद यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची बातमी कळताच कुटुंबीयांसह गावात शोकाकुल वातावरण निर्माण झाले. आज सकाळी वीर जवान प्रमोद जाधव यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी दरे येथे आणण्यात आले. त्याचदरम्यान त्यांच्या पत्नीने एका गोंडस बालिकेला जन्म दिला. पित्याच्या मृत्यूची बातमी आणि घरात आलेला नव्या जीवाचा आनंद, या दोन्ही भावनांनी कुटुंबीय हादरून गेले.
अंत्ययात्रा अंत्यविधीच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर प्रमोद जाधव यांची पत्नी आणि काही तासांपूर्वीच जन्मलेली चिमुकली मुलगी पित्याच्या अंत्यदर्शनासाठी आणण्यात आली. नवजात बालिकेने घेतलेले वडिलांचे अखेरचे दर्शन पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, अनेकांना अश्रू अनावर झाले.
शासकीय इतमामात वीर जवान प्रमोद जाधव यांना मानवंदना देत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी प्रशासनातील अधिकारी, माजी सैनिक, ग्रामस्थ आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशसेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या या वीर जवानाच्या अकाली जाण्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


