बालाजी देडगाव ( प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील देडगाव येथील ख्रिस्तवासी बबनबाई सत्यदान हिवाळे यांच्या स्मरणार्थ मुलांनी उपकार स्तूती प्रार्थना निमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देत सामाजिक उपक्रम म्हणून २१ झाडांचे वृक्षारोपण व २१ महिलांना साड्या वाटप करण्यात आले.
ख्रिस्तवासी बबनबाई हिवाळे यांचे ४० दिवसांपूर्वी निधन झाले होते. यानिमित्ताने मातृऋण अदा करण्याचा थोडासा प्रयत्न म्हणून यावेळी उपकार स्तुती प्रार्थनानिमित्त हिवरा भजनी मंडळ, दळवी भजनी मंडळ, देवगाव भजनी मंडळ, राहुरी भजनी मंडळ, देडगाव भजनी मंडळ, ऑपरेशन हॉस्पिटल भजनी मंडळ, आखेगाव भजनी मंडळ व देवळाली भजनी मंडळ अशा नामांकित भजनी मंडळांनी आपली भजने सादर करत उपकार स्तुतीत भाग घेतला. तर या सोहळ्याला महाराष्ट्रातील नामांकित पास्टर आशिष पडेला, पास्टर एम.डी. हिवाळे, पास्टर मिरपगार, पास्टर पंडित, पास्टर कडूबाळ ससाणे, पास्टर सूर्या गजभू, पास्टर अरुण हिवाळे, पास्टर प्रशांत बनसोडे, पास्टर एलिया हिवाळे, पास्टर गायकवाड हे लाभले. त्यांनी देवाची वचने म्हणत स्तुती आशीर्वाद दिला.
यानिमित्ताने आपण समाजाचे देणे लागतो ही भावना मनात ठेवून आपल्या ख्रिस्तवासी आईच्या स्मरणार्थ देवदान हिवाळे, संजय हिवाळे, विजय हिवाळे व युवा उद्योजक रजनीकांत हिवाळे व अलका सुधीर शहाराव यांनी कब्रस्तान परिसरात २१ झाडाचे वृक्षारोपण केले तर २१ गरजू महिलांना साडी वाटप करण्यात आले.
यावेळी दुःखांकित परिवाराला भेट देण्यासाठी आलेल्या मान्यवरांना भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. आईच्या स्मरणार्थ अनावश्यक खर्चाला फाटा देत सामाजिक उपक्रम राबवल्याबद्दल परिसरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.
