बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे चार दिवसापूर्वी पाथर्डी कॅनॉलमध्ये एका तरुणाच्या मृतदेहाचे तुकडे सापडले होते. हे तुकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर येथील तरुणाचे असल्याची माहिती समोर येत आहे.
पोलिसांनी ते तुकडे उत्तरीय तपासणीला पाठवून या घटनेचा तपास वेगाने सुरू केला व त्याचे धागेदोरे थेट गंगापुरात सापडले आहेत. देडगाव येथील पोलीस पाटील प्रल्हाद ससाणे व सरपंच चंद्रकांत मुंगसे यांनी खबर दिली होती. त्यानंतर नेवासा पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या पथकाने गंगापूर (जि. छत्रपती संभाजीनगर) येथे भेट दिली असता मृतदेह कुणाचा आहे निष्पन्न झाल्याचे समजते. आज त्या मृतदेहावरून आई, वडील व भावाची डी .एन. ए. तपासणी करणार असून नावासहित माहिती समोर येणार आहे. त्या मृतदेहाचे धागेदोरे शोधण्यात नेवासा पोलीस ठाण्याच्या पथकाला यश आल्याचे समजते.
