विजय खंडागळे
………………………………..
सोनई (प्रतिनिधी)- शनिशिंगणापूर ता नेवासा येथे श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्ट शनिशिंगणापूरच्या वतीने देवस्थाचे संस्थापक अध्यक्ष स्व. बाबुराव बानकर (भाऊ) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शनिरत्न पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यावर्षी श्री श्री 1008 परमहंस कृष्णानंद कालिदास महाराज हरियाणा यांना शनिरत्न पुरस्कार श्री क्षेत्र देवगडचे महंत भास्करगिरीजी महाराज यांच्या हस्ते व समाधान महाराज शर्मा, महंत सुनीलगिरीजी महाराज, माजी आमदार पांडुरंग अभंग यांच्या प्रमुख उपस्थितीत व आमदार शंकरराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली प्रदान करण्यात आला. याप्रसंगी समाधान महाराज शर्मा यांचे कीर्तन झाले.
आमदार शंकरराव गडाख याप्रसंगी बोलतांना म्हणाले, स्व. बाबुराव बानकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी देवस्थान विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देते. यावर्षीचा पुरस्कार अध्यत्मिक क्षेत्रात समर्पण भावनेने काम करणाऱ्या कालिदास महाराज यांना देण्यात आला आहे, याचा मनाला विशेष आनंद आहे. श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टने अनेक पथदर्शी प्रकल्प राबविल्याने व शनी महाराजांची असलेली महती यामुळे जगभरातून भाविक येतात. पुरस्काराला उत्तर देताना कृष्णानंद कालिदास महाराज म्हणाले, स्व. बाबुराव बानकर यांनी प्रपचं करून परमार्थ केला. वारकरी परंपरा सुरू ठेऊन भक्तांना 40 वर्षापासून जोडण्याचा प्रयत्न केला. शनी भगवंतांच्या दर्शनाने जीवनतील व्याधी दूर होतात. न्यायदेवता असलेल्या शनी भगवंतांच्या भूमीतून मिळालेला पुरस्कार ऊर्जा देणारा आहे. शनिशिंगणापूर परिसरात पानसनाला सुशोभीकरण प्रकल्प देशातील नदी सुशोभीकरण प्रकल्पाचे रोल मॉडेल पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.
तसेच आमदार शंकरराव गडाख हे सर्व जात, धर्म, साधू संत, महंत यांना बरोबर घेऊन जाणारे नेतृत्व असल्याची प्रशंसा केली. पुरस्कार सोहळ्यासाठी तालुक्यातील अध्यात्मिक क्षेत्रातील संत, महंत उपस्थित होते. याप्रसंगी महंत भास्करगिरीजी महाराज, सुनीलगिरीजी महाराज, माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत व प्रास्ताविक चिटणीस प्रा.आप्पासाहेब शेटे यांनी केले.
याप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर, उपाध्यक्ष विकास बानकर आदींसह आप्पासाहेब शेटे, दीपक दरंदले, पोपट शेटे, पोपट कुऱ्हाट, राज्य पोलीस पाटील संघटनेचे सदस्य ऍड. सयाराम बानकर, प्रा. डॉ. शिवाजी दरंदले, शहाराम दरंदले, छबुराव भुतकर, सुनीता आढाव, उद्योजक सोनी, जयेश शहा, मुकेश तेजवणी, माजी अध्यक्ष सुरेश बानकर आदीसह तालुक्यातील ग्रामस्थ, शनी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित भाविकांना याप्रसंगी देवस्थानच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात आले.