अंबाजोगाई (प्रतिनिधी)- अंध, मूकबधिर व अस्थिव्यंग प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मिश्र गट संकुल असलेल्या अंबाजोगाई येथील शासकीय बहुउद्देशीय संमिश्र दिव्यांग केंद्रात इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतचे प्रवेश घेऊन दिव्यांग विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्वल घडवावे, असे आवाहन अधीक्षक (वर्ग २) आर एस . मोरे यांनी केले आहे.
अंबाजोगाई येथील शासकीय बहुउद्देशीय संमिश्र दिव्यांग केंद्र हे शासकीय संस्था 1975 साली स्थापन झालेली असून अंध, मूकबधिर व अस्थिव्यंग या तिन्ही प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांना एकाच छताखाली विशेष शिक्षण व एकात्म शिक्षण देणारी मराठवाड्यातील संमिश्र स्वरूपाची म्हणजेच मिश्रगट संकुल असणारी निवासी एकमेव शासकीय संस्था आहे.
या संस्थेत वरील तिन्ही प्रवर्गातील दिव्यांग मुलांना विशेष शिक्षण, एकात्म शिक्षण देऊन त्यांच्या पुनर्वसनाची देखील काळजी घेतली जाते. त्याचबरोबर डिजिटल शिक्षण, वसती गृहातील परिपूर्ण सुविधा, प्रवेशित मुलांचा सर्वांगीण विकास याबाबतीत विशेष लक्ष दिले जाते. भौतिक उपचार, व्यवसाय उपचार, समाज उपचार, वैद्यकीय उपचार, आवश्यक ते समुपदेशन आदी सुविधा या संमिश्र केंद्रामार्फत प्रवेशार्थी दिव्यांगांना दिल्या जातात.
वय वर्ष 18 पर्यंत या शासकीय दिव्यांग संस्थेत अंध ,मूकबधिर व अस्थिव्यंग अशा तिन्ही प्रवर्गातील मुलांना शिक्षण व वसतीगृहासाठी प्रवेश दिला जातो. ही शासकीय संस्था असल्याने प्रवेशार्थींना सर्व सुविधा मोफत मिळतात. अंबाजोगाई चा शासकीय बहुउद्देशीय संमिश्र दिव्यांग केंद्राला दिव्यांग शिक्षणाचा चांगला इतिहास, मोठा वारसा आणि यशाची परंपरा असल्याने संस्थेने नावलौकिक प्राप्त केलेले आहे.
चालू शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता पहिली ते दहावी प्रवेश प्रक्रिया सुरू असून या शासकीय दिव्यांग संस्थेचा अर्थातच संमिश्र केंद्राचा मराठवाड्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रवेश घेऊन आपल्या शिक्षण व पुनर्वसनाचा मार्ग सुकर करावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने अधीक्षक आर एस मोरे यांनी केले आहे.