भक्ती रंगात रंगली केंद्र शाळा देडगाव    

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- अवघा महाराष्ट्र विठुरायाच्या भक्ती रंगात न्हाऊन निघत आहे. शाळा देखील परिसरातील ग्रामदैवताच्या दर्शनासाठी बालदिंडी उपक्रमाचे आयोजन करताना आढळत आहेत. बालाजी देडगाव येथील केंद्र शाळेतही सालाबादप्रमाणे यंदाही बाल दिंडीचे नियोजन केल्याचे बघावयास मिळाले. विद्यार्थ्यांच्या हाती भगवे ध्वज, पताका, मृदंग, टाळ, विणा दिसत होत्या. तर मुलींच्या डोक्यावर तुळशी वृंदावन शोभून दिसत होते. विठ्ठलाची प्रतिमा सजवलेल्या पालखीतून मिरवत असताना विद्यार्थ्यांच्या तोंडून ”ज्ञानबा तुकोबा” च्या जयघोषाने परिसर निनादत होता. वारकऱ्याच्या पारंपारिक धोतर सदरा पोशाखातील मुले, नऊवारी साडीतील मुली जणू वारकऱ्यांची प्रतिकृती भासत होत्या. मनाला भावनारे दृश्य होते ते विठ्ठल-रखुमाईच्या रूपातील बाल विद्यार्थी. गावकऱ्यांनीही या बाल विठ्ठल-रखुमाईचे पूजन करून दर्शन घेऊन पंढरीत आल्याचे समाधान मिळवले. आदर्श शिक्षक भाऊसाहेब सावंत यांनी बाल दिंडीला खाऊ वाटप केले. तर सरपंच चंद्रकांत मुंगसे तसेच ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, इन्नुस पठाण, किशोर मुंगसे व इतर ग्रामस्थ यांनीही बालदिंडीत सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांसाठी धामणे दत्तात्रय व कविता करांडे यांनी खिचडी बनवून मुलांना खाऊ घातली. तर ही दिंडी बालाजी मंदिर परिसरात थांबल्यानंतर बथुवेल हिवाळे यांनी “माझे माहेर पंढरी ” यासारखे अभंग गाऊन दिंडीचे वातावरण भक्तिमय केले. शालेय दिंडी उपक्रम यशस्वी करण्यासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रशांत ससाणे व उपाध्यक्ष कविता आबासाहेब बनसोडे यांनीही विशेष परिश्रम घेतले. त्यांना अश्विनी कदम, सुवर्णा जाधव व मुख्याध्यापक सतीश भोसले यांनीही मोलाची साथ दिली. सदर उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्म सहिष्णुता, श्रमप्रतिष्ठा , संवेदनशीलता, निटनेटकेपणा, स्त्री-पुरुष समानता आदी राष्ट्रीय मुल्यांची रुजवणूक होईल, अशी भावना शिक्षणक्षेत्रात व सामाजिक क्षेत्रात व्यक्त होताना दिसते. परिसरात या उपक्रमाचे कौतुक होत आहे.