बालाजी देडगाव येथे उद्या जीवन गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी): नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे उद्या रविवारी (ता.२८) सकाळी ९ वाजता शारदाताई फाउंडेशनच्या वतीने ज्येष्ठांचा जीवनगौरव पुरस्कार सोहळा (७० वर्षावरील वृद्धांचा सन्मान) आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात देडगाव परिसरातील वृद्धांचा समावेश असणार आहे.
महाराष्ट्र राज्याचे माजी मृद जलसंधारण मंत्री आमदार शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली व शारदाताई फाउंडेशनच्या नेवासा पंचायत समितीच्या माजी सभापती सुनीताताई गडाख यांच्या सहकार्याने व हभप उद्धव महाराज मंडलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होत आहे. परिसरातील वृद्धांचा सन्मान करून त्यांच्या जीवनात आनंद देण्याचा प्रयत्न फाउंडेशनच्या माध्यमातून होत आहे. या माध्यमातून दरवर्षी अनेक उपक्रम राबवले जातात. म्हणूनच ज्येष्ठांचा आदर करूया, अनुभवाचा सन्मान ठेवूया या उक्तीप्रमाणे वयोवृद्ध, तपोवृद्ध व्यक्तींचा ट्रॉफी, शाल ,श्रीफळ देऊन सन्मान करण्यात येणार आहे. या सन्मान सोहळ्यासाठी देडगाव परिसरातील सर्व ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थ यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व शारदाताई फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.