ज्येष्ठ साहित्यिक माजी खासदार यशवंतराव गडाख जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित 

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील श्री संत रोहिदास ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिक माजी खासदार यशवंतराव गडाख साहेब यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यशवंतराव गडाख साहेब यांनी त्यांच्या जीवनात केलेल्या सामाजिक कार्यांचा गौरव म्हणून त्यांना या पुरस्काराने सन्मानित केल्याची माहिती श्री संत रोहिदास ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार बन्सीभाऊ एडके यांनी दिली. गडाख साहेब यांनी सर्वसामान्यांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मुळा एज्युकेशन संस्थेच्या माध्यमातून अनेक शाळा, कॉलेज व महाविद्यालये उभारली. तसेच सोनई येथे मुळा सहकारी साखर कारखाना काढण्याचा संकल्प केला. प्रखर विरोध सहन करत आणि संघर्ष करत त्यांनी तो उभारला आणि गेली तीन दशके यशस्वीपणे चालवून दाखवला. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांनी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त योजना प्राधान्याने राबवल्या. त्यांनी सर्वाधिक बजेट पशुसंवर्धन विभागावर खर्च केले होते. आशिया खंडातील सर्वात मोठ्या अहमदनगर जिल्हा बँकेची धुरा यशस्वीपणे सांभाळली. त्याकाळी त्यांनी सोसायटीमार्फत अनेक शेतकऱ्यांना कर्ज वाटप करून पीक कर्ज कमी व्याजदरात उपलब्ध करून दिले. तसेच खासदार पदाच्या कार्यकाळात सर्वसामान्यांना न्याय देत विविध विकासात्मक कामे केली. गडाख साहेब यांनी त्यांच्या संपूर्ण जिवनात सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या कामाचा गौरव करण्याच्या हेतुने श्री संत रोहिदास ग्रामविकास प्रतिष्ठानने त्यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान केला. यावेळी नेवासा पंचायत समितीचे माजी सभापती कारभारी चेडे, बालाजी देवस्थानचे माजी अध्यक्ष कुंडलिक कदम, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, जनाभाऊ तांबे, अनिल दरंदले, शंकर दरंदले,
मुळा कारखान्याचे माजी संचालक एकनाथ जगताप, पांडुरंग रक्ताटे महाराज आदी मान्यवर उपस्थित होते.