बालाजी देडगाव येथे उद्या कुशाबाबा देवाच्या मूर्तीची भव्य मिरवणूक

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे उद्या गुरुवारी (दि.८) कुशाबाबा देवाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सकाळी ८ वाजता कुशाबा मूर्तीची गावातून भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्यामध्ये गजी ढोल, गजी नृत्य, लेझीम व पारंपारिक वाद्याच्या गजरामध्ये भव्य मिरवणूक होणार आहे. तसेच पारंपारिक वेशभूषा व भक्तीगीते सादर करण्यात येणार आहे. तर शुक्रवारी (दि.९) श्रीराम साधना आश्रम मुकिंदपुरचे मठाधिपती महंत सुनीलगिरी महाराज यांच्या शुभहस्ते मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशरोहन सोहळा पार पडणार असून, ११ वाजता महंत सुनीलगिरी महाराज यांची प्रवचन सेवा ठेवण्यात आली आहे. तर पुर्णाहूती, आरती व मूर्तीची विधिवत पूजा बाळदेवा तांदळे गुरुजी हे करणार आहेत.
या सोहळ्यासाठी गाथामूर्ती हभप सुखदेव महाराज मुंगसे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तर सोहळ्यानंतर सर्व भाविकांना समस्त टकले परिवाराकडून महाप्रसादचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा कोकरे वस्ती शेजारी टकले वस्ती येथे पार पडणार आहे. तरी या कार्यक्रमात जास्तीत जास्त भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संपत देवा टकले , नामदेव देवा टकले व समस्त टकले परिवार व ग्रामस्थ यांच्याकडून करण्यात आले आहे.