जनशक्ती (वृत्तसेवा)- नगर जिल्ह्यात आज व उद्या (दि.२०) वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. यानुसार, नगर जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत प्रसिध्दी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे नागरिकांना पुढीलप्रमाणे आवाहन केले आहे. मेघगर्जनेच्या वेळी किंवा वीज चमकत असताना झाडाखाली उभे राहू नये. सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या, गडगडाटीच्या वादळात विद्युत उपकरणांचा वापर टाळा, धोकादायक ठिकाणी सेल्फी घेणे टाळा, लटकणाऱ्या केबल्स, धातुचे कुंपण, विद्युत खांब यांपासून दूर राहा, जाहिरात फलकांच्या आजूबाजूला थांबू नका, वीज चमकत असताना मोकळ्या जागेवर गुडघ्यावर बसून सुरक्षित रहा, सखल भागात राहणारे नागरिक तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करा. नदी, ओढे व नाल्यांपासून दूर रहा, भूस्खलन आणि दरडी कोसळण्याच्या शक्यतेमुळे डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्यांनी विशेष दक्षता घ्या, घाट रस्त्याने प्रवास टाळावा आणि धरण किंवा नदीक्षेत्रात पर्यटन करताना विशेष खबरदारी घ्या, आपत्कालीन परिस्थितीत तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन किंवा जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर यांचेशी 1077 (टोल फ्री), 0241-2323844 वा 2356940 वर संपर्क साधावा, असे आवाहनही प्रसिध्दी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
