बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील रहिवाशी व गोंडेगाव येथील हनुमान माध्यमिक विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक सागर बनसोडे यांना चिलेखनवाडी येथील युवा बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा यावर्षीचा युवा शिक्षणरत्न पुरस्कार जााहीर झाला आहे. सामाजिक, शैक्षणिक, कृषी, वैद्यकीय, क्रीडा व पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांना या संस्थेमार्फत पुरस्कार देऊनव दरवर्षी गौरविण्यात येते. यावर्षीचा युवा शिक्षणरत्न पुरस्कार सागर बनसोडे यांना जाहीर करण्यात आला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत कांबळे यांनी दिली.
सागर बनसोडे यांनी मागील १६ वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. विद्यार्थी हिताचे अनेक उपक्रम राबविले आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बहुद्देशीय संस्थेच्या माध्यमातून सामाजिक व शैक्षणिक चळवळीत सक्रिय आहेत. त्यांच्या या कामाची दखल घेऊन त्यांना या वर्षीचा शिक्षकरत्न पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. हा पुरस्कार रविवार दि. २९ सप्टेंबर रोजी महंत सुनिलगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते व ज्येष्ठ साहित्यीक, विचारवंत सुभाष सोनवणे, ॲड. हिंमतसिंह देशमुख, युवा नेते अब्दुल शेख, अशोक पाटील, बजरंग पुरी आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे, असे प्रतिष्ठाणचे सचिव प्रा. सुनिल पंडित यांनी सांगितले. या पुरस्काराबद्दल सागर बनसोडे यांचे बालाजी देडगाव व गोंडेगाव परिसरातून अभिनंदन होत आहे.
