बालाजी देडगाव येथे बालाजी यात्रेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन 

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने व हभप सुखदेव महाराज मुंगसे यांच्या अधिपत्याखाली सालाबादप्रमाणे बालाजी यात्रा उत्सव निमित्त वर्ष ५४ वे अखंड हरिनाम सप्ताह व श्री संत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी (ता.९) ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला सुरुवात होणार असून शुक्रवारी (ता.१६) पारायण सोहळ्याची सांगता होणार आहे.  या सप्ताहनिमित्ताने किर्तन सेवेसाठी महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकाराची किर्तनसेवा ७ ते ९ या वेळेत होणार आहे. दररोज पहाटे ४ ते ६ काकड आरती ६ वाजता बालाजी आरती, ७ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, ३ ते ५ प्रवचन, ५ ते ६ हरिपाठ अशा विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दररोज सकाळी व सायंकाळी अन्नदानाचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवारी (ता.९) गुरुवर्य आदिनाथ महाराज शास्त्री तारकेश्वर गड, गुरुवारी (ता.१०) गुरुवर्य भागवत महाराज उंबरे वृद्धेश्वर देवस्थान, शुक्रवार ११ रोजी गुरुवर्य मोठे माऊली महाराज कदम आळंदी देवाची, शनिवार दिनांक १२ रोजी दसऱ्यानिमित्त गाथमूर्ती सुखदेव महाराज मुंगसे देडगाव, रविवार दिनांक १३ रोजी गुरुवर्य दादा महाराज वायसळ नवीन कायगाव, सोमवार दिनांक १४ रोजी गुरुवर्य देविदास महाराज मस्के नेवासा संस्थान, मंगळवार दिनांक १५ रोजी गुरुवर्य रामेश्वर महाराज शास्त्री घोडेगाव यांची दैनंदिन कीर्तनरुपी सेवा आयोजित करण्यात आली आहे. तर बुधवार दिनांक १६ रोजी सकाळी ९ ते ११ भागवताचार्य नाना महाराज सूर्यवंशी, आळंदी देवाची यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दिनांक १७ ऑक्टोबर रोजी बालाजी यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. तसेच १७ ऑक्टोबर रोजी पहाटे ४ वाजता श्रीची पालखी मिरवणूक होईल. तसेच शुक्रवार दिनांक १८ रोजी दुपारी ३ वाजता जंगी हंगामाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दिनांक १९ रोजी सकाळी ९ ते ११ हभप गुरुवर्य प्रकाशानंदगिरी महाराज, देवगड संस्थान यांच्या तीर्थप्रसादाच्या कीर्तनाने यात्रा उत्सवाची सांगता होईल. तरी जास्तीत जास्त भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री स्वयंभू बालाजी देवस्थान ट्रस्ट, समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ श्री क्षेत्र बालाजी देडगाव यांनी केले आहे.