महाराष्ट्र विधानसभेचा बिगुल वाजला; असा असेल निवडणूक कार्यक्रम

महाराष्ट्र

जनशक्ती (वृत्तसेवा)- अनेक दिवसांची प्रतिक्षा असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. आज केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह झारखंड विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक होणार असून 20 नोव्हेंबर रोजी मतदान होईल. तर, 23 नोव्हेंबर रोजी निवडणुकांचा निकाल लागणार आहे. राज्यातील 288 मतदारसंघात निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून याच महिन्यात २२ ते २९ ऑक्टोबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. ३० ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रिया होईल. ४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत असेल. म्हणजे, 15 दिवसांतच उमेदवारांना अर्ज भरण्याची तयारी करावी लागणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्या महिन्यात राज्यातील राजकीय पक्ष व विविध संस्थांशी चर्चा करुन विधानसभा निवडणुकांचा आढावा घेतला होता. त्यानंतर, पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसाठीची माहिती देत दिवाळीनंतर राज्यात निवडणुका होतील, असे संकेत दिले होते. तसेच, केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रमुख राजीव कुमार यांनी राज्यातील मतदारांची संख्या, पुरुष, महिला, तृतीयपंथी मतदार आणि मतदारांमध्ये झालेल्या वाढीसंदर्भात माहिती देखील दिली होता. आता, नियोजित पत्रकार परिषदेतून आज राजीव कुमार यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसंदर्भात पत्रकार परिषद घेऊन राज्यातील निवडणुकांची घोषणा केली आहे. गेल्या महिनाभरापासून राज्याचं लक्ष लागलेल्या निवडणुकांच्या घोषणेचा दिवस अखेर उजाडला असून महाराष्ट्र विधानसभा 2024 च्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. त्यामुळे, आता दिवाळीनंतर पुन्हा एकदा दिवाळीसारखे फटाके फुटणार आहेत.
निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार, राज्यात एकूण 288 विधानसभा मतदारसंघांत निवडणूक होत आहे. 9.63 कोटी मतदार असून 4.97 कोटी पुरुष मतदार तर 4.66 कोटी महिला मतदार आहेत. त्यामध्ये, 1.85 कोटी तरुण मतदार आहेत, यंदा पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नवयुवकांची संख्या म्हणजे नव मतदार 19.48 लाख एवढे आहेत. राज्यांत महिला मतदारांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून 10.77 लाख मतदार आहेत. राज्यात 100 वर्ष पूर्ण करणारे मतदार 47,776 आहेत. तर, 85 वर्षापेक्षा अधिक वय 42 लाख 43 हजार, तर 6.36 लाख दिव्यांग आणि 6,031 तृतीयपंथी मतदार आहेत.

 

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचं वेळापत्रक पुढीलप्रमाणे-

निवडणुकीचं नोटिफिकेशन – 22 ऑक्टोबर 2024
अर्ज भरण्याची तारीख – 22 ते 29 ऑक्टोबर
अर्ज माघार घेण्याची तारीख – 4 नोव्हेंबर
मतदानाची तारीख – 20 नोव्हेंबर
मतमोजणी – 23 नोव्हेंबर
निवडणूक प्रक्रिया समाप्त – 25 नोव्हेंबर  2024