नेवासा विधानसभेसाठी २४ उमेदवारांनी दाखल केले ३३ अर्ज 

राजकीय

जनशक्ती (वृत्तसेवा)- राज्यभरात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. महाविकास आघाडी, महायुती तसेच इतर पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. संभाव्य उमेदवारांनी उमेदवारी मिळवण्यासाठी आपली ताकद लावली आहे. नेवासा विधानसभा मतदारसंघातही उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच झाल्याचे बघायला मिळाले.  २२ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर या अर्ज भरण्याच्या कालावधित नेवासा विधानसभा मतदारसंघात २४ उमेदवारांनी ३३ अर्ज दाखल केले आहेत. ८३ संभाव्य उमेदवारांनी एकुण १५० अर्ज विकत नेले होते. मात्र, प्रत्यक्षात ११७ अर्ज दाखल झालेले नाहीत.

सोमवारी (ता.२८)  शिवसेना ठाकरे गटाकडून आमदार शंकरराव गडाख यांनी चार अर्ज, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे तीन अर्ज व अन्य पाच उमेदवारांचे सहा अर्ज दाखल झाले आहेत. मंगळवारी (ता.३०) विठ्ठलराव लंघे (शिवसेना शिंदे गट), अब्दुल शेख (राष्ट्रवादी अजित पवार गट), शशिकांत मतकर (रासप), हरीभाऊ चक्रनारायण (बीएसपी) तर अपक्ष म्हणून मुकुंद अभंग, रत्नमाला लंघे, अजित काळे, ज्ञानदेव पाडळे, वसंत कांगुणे, जगन्नाथ कोरडे, सचिन प्रभाकर दरंदले, सचिन देसरडा, ऋषिकेश शेटे, गोरक्षनाथ कापसे, शरद माघाडे, रामदास चव्हाण, रविराज गडाख यांचे अर्ज दाखल झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अरुण उंडे यांनी दिली आहे. आज ३० ऑक्टोबरला अर्ज छाननी करण्यात येऊन ४ नोव्हेंबरला २०२४ रोजी अर्ज मागे घेता येईल. अर्ज माघारीनंतर मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. २० नोव्हेंबरला मतदान तर मतमोजणी २३ नोव्हेंबरला होणार आहे.