जनशक्ती (वृत्तसेवा)- ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात आघाडीच्या फलंदाजांच्या निष्क्रिय फलंदाजीचा फटका टीम इंडियाला बसला. नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर टीम इंडियाच्या वाटेला गोलंदाजी आली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्व गडी गमवून 474 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाचा डाव गडगडला. भारताकडून नितीश कुमार रेड्डीने पहिल्या डावात चांगली झुंज दिली. शतकी खेळी करत भारतावरील फॉलोऑनचं संकट टाळलं. तसेच भारताला चांगल्या स्थितीत आणून ठेवलं. भारताने पहिल्या डावात 369 धावांची खेळी केली. तरी ऑस्ट्रेलियाकडे 105 धावांची आघाडी होती. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने या धावांच्या पुढे खेळताना 234 धावांची खेळी केली. शेपटाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना चांगलंच झुंजवलं. तसेच भारतासमोर पाचव्या दिवशी 340 धावांचं मोठं आव्हान ठेवलं. खरं तर हे आव्हान गाठणं काही सोपं नव्हतं. त्यामुळे ड्रॉ करण्याशिवाय पर्याय नव्हता. पण आघाडीच्या फलंदाजांनी नांगी टाकली. टीम इंडिया 155 धावांवर ऑलआऊट झाली आणि ऑस्ट्रेलियाने 184 धावांनी विजय मिळवला.
कर्णधार रोहित शर्मा 9, केएल राहुल 0, विराट कोहली 5, रवींद्र जडेजा 2, नितीश कुमार रेड्डी 1 धाव करून बाद झाले. दुसरीकडे यशस्वी जयस्वालने 84 धावांची झुंजार खेळी केली. सामना वाचवण्याचा पूरेपूर प्रयत्न केला. खरं तर ऋषभ पंतच्या एका चुकीच्या फटक्यामुळे भारताची लय तुटली. ऑस्ट्रेलियाला सामन्यात कमबॅक करण्याची संधी मिळाली. त्यानंतर यशस्वी जयस्वालला वादग्रस्त पद्धतीने रिव्हयूत बाद झाला. त्यामुळे भारताची लय पूर्णपणे बिघडून गेली. शेपटाचे फलंदाज 20 षटकं खेळून काढतील अशी स्थिती नव्हती. त्यामुळे भारत हा सामना गमवणार हे स्पष्ट झालं होतं. या सामन्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2024-25 चा शेवटचा सामना आता सिडनी क्रिकेट मैदानावर खेळवला जाईल, जो पुढील वर्षाचा पहिला सामना असेल. फायनलच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी टीम इंडियाला हा सामना कोणत्याही किंमतीवर जिंकावाच लागेल, अन्यथा भारत फायनलच्या शर्यतीतून बाहेर पडेल.