अहिल्यानगरमध्ये २९ जानेवारीपासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा

आपला जिल्हा

जनशक्ती (वृत्तसेवा)- अहिल्यानगर शहरात महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने व अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने ६७ व्या वरिष्ठ माती व गादी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताब लढत २९ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत येथील वाडियापार्क मैदानात होत आहेत, अशी माहिती जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आमदार संग्राम जगताप यांनी दिली.
या कुस्ती स्पर्धेमध्ये एकूण ८४० कुस्तीगीर सहभागी होत आहेत. या स्पर्धेदरम्यान ८५० ते ९०० कुस्त्या होतील. या स्पर्धेत १०० पंच व ८० पदाधिकारी यांच्या सहकार्याने स्पर्धा पार पाडल्या जातील. या स्पर्धेत महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे, सिकंदर शेख, हर्षवर्धन सदगीर, बाला रफीक शेख, महेंद्र गायकवाड, पृथ्वीराज मोहोळ, वेताळ शेळके, माऊली कोकाटे, शुभम शिंदनाळ, सुदर्शन कोतकर, माऊली जमदाडे हे प्रमुख आकर्षण असणार आहेत. स्पर्धेतील विजेत्याला बक्षीस म्हणून चारचाकी वाहन भेट देणार असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली. स्पर्धेच्या उद्घाटन व बक्षीस वितरण समारंभासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, क्रीडा मंत्री दत्तात्रेय भरणे, भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंग व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माजी खासदार रामदास तडस उपस्थित राहणार आहेत.