बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे व मुळा एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, माका यांचे संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना शिबीराचे पहिले पुष्प बालाजी देडगाव येथे प्राचार्य डॉ. किशोर धनवटे यांनी आज (ता.२२) गुंफले. त्यांनी ‘स्वामी विवेकानंद आणि आजचा युवक’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्वामी विवेकानंदाचे विचार आपण जीवनात कसे अंगीकारले पाहिजे, हे त्यांनी उदाहरणांच्या सहाय्याने सांगितले. त्याचबरोबर ‘वाचाल तर वाचाल’ म्हणी प्रमाणे वाचनाचे महत्त्व सांगितले. जीवन जगताना सकारात्मक दृष्टिकोन यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे .कोणत्याही गोष्टीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पहा असे सांगितले. भगवतगीता व ज्ञानेश्वरीतील तत्त्वज्ञानाचा अर्थ विविध उदाहरणांच्या साहाय्याने त्यांनी सांगितला. तसेच अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. भानुदास चोपडे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेतील श्रम संस्काराचे महत्त्व विशद केले. पाहुण्याचा परिचय सह कार्यक्रम अधिकारी प्रा. अमोल दरंदले यांनी करून दिला. कार्यक्रमांचे सुत्रसंचालन सह कार्यक्रम अधिकारी प्रा. भक्ती बजांगे यांनी केले तर आभार कार्यक्रम अधिकारी प्रा. निखिल निपुंगे यांनी मानले. यावेळी विद्यार्थी, प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
