माका महाविद्यालयाच्या हिवाळी श्रम संस्कार शिबीराची सांगता

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)-  मुळा एज्युकेशन सोसायटीचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, माकाच्या बालाजी देडगाव येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या हिवाळी शिबीराची उत्साहात सांगता झाली. सात दिवसाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिराचे आयोजन २१ जानेवारी ते २७ जानेवारी २०२५ या काळात करण्यात आले होते. सांगता सोहळाप्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून सरपंच चंद्रकांत मुंगसे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. भानुदास चोपडे होते. कार्यक्रम प्रसंगी बोलताना सरपंच चंद्रकांत मुंगसे म्हणाले, युवक हा देशाचा कणा असतो, त्यांच्यावर वेगवेगळ्या वयात वेगवेगळे संस्कार होणे गरजेचे असते. त्यातीलच एक श्रम संस्कार होय. युवकांनी हिवरे बाजार येथील पोपटराव पवारांचा आदर्श घेवून परिस्थितीनुसार आवश्यक त्या समाज सुधारणा कराव्यात. यावेळी पत्रकार युनूस पठाण, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. भानुदास चोपडे यांनी मनोगत व्यक्त केले.
प्राचार्य डॉ. चोपडे म्हणाले, श्रमदानाचे गुण राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून वाढीस लागतात. संघकार्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते. विद्यार्थ्यांच्या उपजत कला गुणांना चालना देण्यासाठी अशा उपक्रमात विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे. या वर्षी “युथ फॉर माय भारत” या संकल्पनेवर आधारित शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात स्वामी विवेकानंद आणि युवक, युवा संस्कार, छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रशासन, लोकसंख्या निर्मूलन या विषयावर व्याख्याने व पथनाट्य आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांकडून शिबिर काळात बालाजी मंदिर, महादेव मंदिर, दत्त मंदिर, खंडोबा मंदिर, पावन गणपती मंदिर, हनुमान मंदिर व मज्जिद परिसर स्वच्छता केली. तसेच बाजार पेठ, गावातले रस्ते साफसफाई केली. अहिल्याबाई होळकर व माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भेट व परिसर स्वच्छता केली. विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम घेतले, प्रभात फेरी या अंतर्गत उपक्रम गाव सर्वेक्षण, स्त्री भ्रुणहत्या असे विविध उपक्रम राबविण्यात आले. यावळी ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, सुनिल मुथ्था (विश्वस्त बालाजी देवस्थान), दत्ता मुंगसे (माजी सरपंच), श्रीखंडे भाऊसाहेब (तलाठी तेलकुडगाव), भैरवनाथ मुंगसे, संजय मुंगसे ( जय हरी), रामभाऊ कुटे (देवस्थान ट्रस्ट), महादेव पुंड, पांडुरंग एडके आदी मान्यवर उपस्थित होते. अहवाल वाचन कार्यक्रम अधिकारी प्रा. निखिल निपुंगे यांनी केले. सूत्रसंचालन सह कार्यक्रम अधिकारी प्रा. भक्ती बजांगे व प्रा. अमोल दरंदले यांनी केले. तर पाहुण्यांचा परिचय डॉ. प्रा. अमोल दहातोंडे यांनी केला. अध्यक्षीय सूचना प्रा. शहाबाज सय्यद यांनी मांडली तर अनुमोदन सहकार्यक्रम अधिकारी प्रा. प्राजक्ता गायके यांनी दिले. कार्यक्रम प्रसंगी उपस्थितांचे आभार मंदार कुलकर्णी, प्रा. भक्ती बजांगे यांनी मानले व पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमप्रसंगी सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर सेवक, विद्यार्थी विद्यार्थिनी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.