जनशक्ती (वृत्तसेवा)- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आर्थिक पाहणी सादर होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक पाहणी अहवाल मांडणार आहेत. उद्या निर्मला सीतारामन अर्थसंकल्प मांडणार आहेत. या अर्थसंकल्पात प्राप्तिकरासंदर्भात मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. करमुक्त उत्पन्नाची मर्यादा आठ लाखांपर्यंत वाढवली जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थसंकल्पातून मध्यमवर्गाला मोठा दिलासा मिळू शकतो. प्राप्तिकर रचनेत मोठे बदल केले जाऊ शकतात. ज्यामुळं मध्यमवर्गावरील कराचा भार कमी होऊ शकतो. करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढवल्यास नागरिकांच्या हातात अधिक रोख रक्कम शिल्लक राहील यामुळं त्यांच्या बाजारातील खरेदी क्षमतेत वाढ होईल. याचा परिणाम होऊन अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा होऊ शकते. इकोनॉमिक टॉइम्सच्या रिपोर्टनुसार आठ लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त होण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यासंदर्भात मोठी घोषणा करु शकतात. केंद्र सरकारचा नव्या टॅक्स रिजीम मध्यमवर्गासाठी फायदेशीर करण्याचा प्रयत्न आहे. आतापर्यंत 72 टक्के लोक नव्या टॅक्स रिजीममध्ये आले आहेत. केवळ 28 टक्के लोक ओल्ड टॅक्स रिजीममध्ये आहेत. नव्या टॅक्स रिजीमनुसार भारत सरकार वार्षिक आठ लाख उत्पन्न करमुक्त करण्यासंदर्भात घोषणा करु शकते. मात्र, 8 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्यांवर 25 टक्के कर लावू शकते. 2025 च्या अर्थसंकल्पात मध्यवर्गाला मोठी भेट मिळू शकते.
