जनशक्ती (वृत्तसेवा)- दुहेरी हत्याकांडाने शिर्डीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी तिघा जणांवर प्राणघातक हल्ले करण्यात आले. धक्कादायक म्हणजे मृतांमध्ये शिर्डीच्या साई संस्थानच्याच दोघा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सुभाष घोडे आणि नितीन शेजुळ अशी मृतांची नावे आहेत.आज पहाटे तासाभराच्या अंतरात झालेल्या तीन वेगवेगळ्या ठिकाणच्या घटनेत दोघांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेने शिर्डीत एकच खळबळ उडाली. याप्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे. पहाटेच्या दरम्यान शिर्डी शहर परिसरातील कर्डोबा नगर, साकुरी शिव आणि श्रीकृष्ण नगर अशा तीन ठिकाणी तीन घटना घडल्या, त्यादेखील चाकू हल्ल्याच्या. या तिन्ही घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.साईबाबा संस्थानमध्ये नोकरीला असणारे सुभाष घोडे हे पहाटे ड्युटीवर जात असताना कर्डोबा नगर चौक येथे तर नितीन शेजुळ हा कंत्राटी सुरक्षा रक्षक ड्युटी संपवून घरी जात असताना साकुरी शिव याठिकाणी त्यांच्यावर हल्ला झाला. यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच माजी खासदार सुजय विखे हे देखील तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी रूग्णालयात धाव घेत नातेवाईकांना धीर देण्याचा प्रयत्न केला. आरोपीला लवकर जेरबंद केलं जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. पोलिस अधीक्षक राकेश ओला हे देखील शिर्डीत दाखल झाले आणि त्यांनी मृत कुटुंबीयांच्या नातेवाईकांची भेट घेतली. याप्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेतलं असल्याची माहिती दिली.
