मुळा धरणातून सोमवारी आवर्तन सुटणार: आमदार विठ्ठलराव लंघे पाटील

आपला जिल्हा

जनशक्ती (वृत्तसेवा)- मुळा लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना पाण्याच्या आवर्तनाची नितांत गरज लक्षात घेवून रब्बी हंगामासाठी तातडीने आवर्तन सुरु करण्याची मागणी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंञी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली असता विखे पाटील यांनी आमदार लंघे यांची ही मागणी लक्षात घेवून सोमवार (दि.१७) फेब्रुवारीपासून आवर्तन सोडण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत.
यापुर्वी मुळा उजव्या कालव्याचे रब्बी आवर्तन ठरलेल्या नियोजनाप्रमाणे पूर्ण झालेले असून उन्हाळी आवर्तन १ मार्चपासून सुरु करण्याचे नियोजन झालेले होते. माञ, या लाभक्षेत्रात पाण्याची पातळी खूपच खालावल्यामुळे नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्याकडे मुळा उजव्या कालव्यातून आवर्तन सोडण्याची मागणी केली असता ही मागणी आमदार लंघे यांनी पालकमंत्री विखे पाटील यांच्याकडे करुन शेतकऱ्यांना तातडीने मुळाचे आवर्तन सुरु करण्यासाठी प्रयत्न केल्यामुळेच सोमवारपासून मुळाचे पाटपाणी सोडण्यात येणार असल्यामुळे नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांतून मोठे समाधान व्यक्त केले जात आहे. या संदर्भात मंत्री विखे पाटील यांनी आवर्तन सुरू करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्यामुळे आमदार विठ्ठलराव लंघे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निर्णयाचे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे.