देडगाव येथे महाशिवरात्रीनिमित्त यात्रा उत्सवाचे आयोजन

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेच्या मुख्य दिवशी सकाळी ७ ते ११ शिवलिला अमृत ग्रंथाचे पारायण होणार आहे. यात्रेच्या दिवशी दुपारी १२ वाजता आमदार विठ्ठलराव लंघे पाटील भेट देणार असून यावेळी त्यांचा कैलासनाथ मित्रमंडळाच्या वतीने सन्मान करण्यात येणार आहे. दुपारी ४ ते ७ या वेळेत पालखी मिरवणूक होणार आहे. यावेळी शोभेच्या दारुची आतिषबाजी होणार आहे. रात्री ८ ते १० प्रवीण महाराज गोसावी (पैठण) यांची किर्तनसेवा होणार आहे. यात्रेच्या दिवशी कावडीद्वारे आणलेल्या पाण्याने महादेवाचा अभिषेक करण्यात येणार आहे.
यात्रेच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते ११ हभप राजेंद्र महाराज वाघमारे (गोंदी) यांच्या काल्याचे कीर्तन व महाप्रसादाने यात्रोत्सवाची सांगता होणार आहे. तर २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता जंगी हगाम्याचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रा उत्सवाचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महादेव मंदिर देवस्थान, कैलासनाथ मित्र मंडळ, समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ देडगाव यांनी केले आहे.