धनत्रयोदशीला पूजा कशी करावी? आजचा शुभ मुहूर्त कोणता? जाणून घ्या सविस्तर…

महाराष्ट्र

जनशक्ती (वृत्तसेवा)- धनत्रयोदशीला महालक्ष्मी माता, कुबेर देवता आणि भगवान धन्वंतरी यांची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. दरवर्षी आश्विन महिन्यातील वद्य त्रयोदशी तिथीला ‘धनत्रयोदशी’ साजरी केली जाते. धनत्रयोदशी म्हणजेच देवतांचे वैद्य ‘धन्वंतरी देवता’ यांची जयंती. या दिवशी पूजा कशी करावी? कोणत्या मुहूर्तावर पूजा करावी? याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया…
पौराणिक मान्यतेनुसार धनत्रयोदशीच्या दिवशी महालक्ष्मी माता आणि धन्वंतरी देवतेचीही पूजा करण्याचे महत्त्व आहे. चौरंगावर पिवळ्या रंगाचे वस्त्र अंथरावे. त्यावर स्वस्तिक काढावे. चौरंगावर लक्ष्मीमाता, भगवान धन्वंतरी आणि कुबेर देवतेची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी. तांदळावर दिवा ठेवून प्रज्वलित करावा. चौरंगावरील देवांना जल, हळद-कुंकू, फुले, फळं आणि मिठाई अर्पण करावे. मंत्राचा जप करावा. आरती-प्रार्थना करुन प्रसादाचे वाटप करावे. धनत्रयोदशीच्या तिथीस १८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.१८ वाजता प्रारंभ होणार असून १९ ऑक्टोबर रोजी दुपारी १.५१ वाजता तिथी समाप्त होणार आहे. प्रदोष काळ १८ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६.१३ वाजेपासून ते रात्री ८.४१ वाजेपर्यंत आहे. अभ्यासकांच्या मतानुसार आज धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तानंतर (संध्याकाळी ५.५७ वाजेनंतर ) घरातील रोखरक्कम, कोणतेही मुठभर धान्य, नोटा, सोने-चांदी यांचे यथाशक्ती पूजन अर्चन करावे. श्री लक्ष्मीदेवींचे पूजन करून धणे-गूळ एकत्रित करून नैवेद्य अर्पण करावा आणि घरातील मंडळींनाही हा प्रसाद द्यावा.